Ad will apear here
Next
वाढदिवसानिमित्त दोघी मैत्रिणींनी केले वृद्धाश्रमाचे नूतनीकरण
शिवगंगा वृद्धाश्रमातील महिलांसोबत संगीता सक्सेना, गंगा पाटील व प्रिया कपाडिया

पुणे : वाढदिवस म्हणजे पार्टी, भेटवस्तू असा आनंदसोहळा असतो. अनेक जण मोठ्या प्रमाणात खर्च करतात; पण वाढदिवस साजरा करताना सामाजिक भान जपणारेही काही जण असतात. संगीता सक्सेना आणि प्रिया कपाडिया या दोघी मैत्रिणी अशांपैकीच. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वीस लाख रुपये खर्चून पुण्यातील शिवगंगा वृद्धाश्रमाचे नूतनीकरण केले. त्यामुळे या वृद्धाश्रमाचा कायापालट झाला असून, तेथील वातावरण अगदी प्रसन्न झाले आहे. 

समाजासाठी, विशेषतः ज्येष्ठ लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, हा या दोघींच्या मैत्रीतील समान धागा. याच जाणिवेतून त्यांनी हे काम केले असून, २० लाखांपैकी काही निधी ‘डीड्स फॉर नीडस फाउंडेशन’ या आपल्या संस्थेमार्फत उभा केला आहे. 


निवृत्त परिचारिका असलेल्या गंगा पाटील यांनी २००१मध्ये शिवगंगा महिला मंडळ ही संस्था स्थापन करून त्याअंतर्गत वानवडी येथे शिवगंगा वृद्धाश्रम सुरू केला. सुरुवातीला तेथे पाच-सहा निराधार महिला होत्या. आता या वृद्धाश्रमाच्या दोन शाखा असून, एकूण २५ महिला आहेत. कामशेत येथे एक वृद्धाश्रम असून, तेथे दहा महिला आहेत. वानवडी येथे गेल्या सात वर्षांपासून सेवाधाम संस्थेच्या भाडेतत्त्वावरील जागेत असलेल्या वृद्धाश्रमात सध्या १५ महिला आहेत. 

संगीता सक्सेना गेली चार-पाच वर्षे अधूनमधून येथे भेट देत होत्या. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले, की येथील महिलांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. पैशाअभावी संस्थेला अनेक सुविधा उपलब्ध करणे शक्य होत नव्हते. तेव्हा त्यांनी प्रिया कपाडिया यांच्याशी चर्चा केली. दोघींनी या वृद्धाश्रामासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. स्वयंपाकघर, स्वच्छतागृहे आदींचे नूतनीकरण, फरश्या, रंगरंगोटी, बेड्स आदी सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थेतर्फे निधी जमवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी येथे दोन उत्तम दर्जाची सर्व सोयींनी युक्त स्वच्छतागृहे, स्वयंपाकघरात ओटा, भांडी धुण्यासाठी सिंक अशा सुविधा उपलब्ध केल्या. उत्तम दर्जाचे दहा बेड्स, टेबल, बेडशीट, लॉकर्स, सौर ऊर्जा संयंत्र आदी सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिल्या. तब्बल वीस लाख रुपये खर्च करून त्यांनी या वृद्धाश्रमाचे रूपडेच बदलून टाकले. त्यामुळे तेथे राहणारे ज्येष्ठ नागरिक अत्यंत आनंदी झाले असून, समाजातूनही संगीता सक्सेना आणि प्रिया कपाडिया यांचे कौतुक होत आहे. 


आपल्या या उपक्रमाबाबत बोलताना प्रिया कपाडिया म्हणाल्या, ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करण्याची आम्हा दोघींची इच्छा होती. संगीता आधीपासून या वृद्धाश्रमाला भेट द्यायला येत असे. एकदा आम्ही दोघींनी भेट दिली, तेव्हा लक्षात आले, की येथे राहणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोयदेखील व्यवस्थित नाही. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे आम्हाला वाटले. लगेच आम्ही काही करू शकलो नाही; पण काही दिवसांनी आम्हाला एक देणगीदार भेटले, ज्यांनी येथे स्वच्छतागृहाच्या संपूर्ण कामासाठी देणगी देण्याचे मान्य केले. त्यानुसार दोन महिन्यांत येथे साडेसहा लाख रुपये खर्च करून सर्व सोयींनी युक्त अशी दोन स्वच्छतागृहे आणि भांडी धुण्यासाठी मोठी जागा तयार करण्यात आली.’ 

‘हळूहळू आम्ही निधी जमा करून तीन टप्प्यांत या जागेचे नूतनीकरण केले. फरश्या बदलल्या, फ्रेंच विंडोज केल्या. त्यामुळे येथे स्वच्छ हवा, चांगला उजेड आला. वर-खाली करता येणारे दहा बेड्स, नवीन बेड्शीटस, टेबल, फिल्टर आदींचीही व्यवस्था केली. आता या वृद्धाश्रमाला ज्या ज्या गोष्टींची गरज असेल, ते आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे उपलब्ध करून देऊ. आता कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत,’ असेही कपाडिया यांनी सांगितले.


संगीता सक्सेना म्हणाल्या, ‘१६ वर्षांपूर्वी मी उत्तर प्रदेशमधून पुण्यात आले. प्रियाशी माझी ओळख झाली आणि आम्हाला दोघींनाही समाजासाठी काही तरी करायचे होते. त्यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट झाली. कुठून सुरुवात करायची हे कळत नव्हते. एखादी संस्था स्थापन केली तर काम करणे सोपे जाईल, हे लक्षात आले आणि आम्ही डीड्स फॉर नीड्स फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करायचे ही आम्हा दोघींचीही तीव्र इच्छा होती. त्या दरम्यान मी या संस्थेला भेट दिली होती. अनेकदा भेट दिल्यावर लक्षात आले की, आपण येथे काही तरी चांगले काम करू शकतो. या लोकांनाही त्याची गरज आहे. येथे आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आम्ही ठरवले. 

‘आम्ही ठरवलेल्या कामासाठी निधीची आवश्यकता होती. तो उभा करताना मात्र खूप अडचणी आल्या. लोक ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’अंतर्गत शिक्षणासाठी निधी देतात; मात्र वृद्धाश्रमासाठी पैसा द्यायला सहज तयार होत नाहीत, असा अनुभव आला. त्यामुळे या कामासाठी पैसा उभारण्यासाठी आम्हाला थोडा जास्त वेळ लागला; पण शेवटी आम्ही हे काम पूर्ण केले. येथील लोकांना आम्ही एक चांगला निवारा देऊ शकलो आहोत, याचा खूप आनंद आहे,’ असे संगीता म्हणाल्या.


‘येथे आणखीही काही गोष्टींची गरज आहे, त्याही पूर्ण होतील; पण यांची सर्वांत महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे त्यांच्यासाठी कुणी तरी दिलेला वेळ. त्यांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, गप्पा मारणे, त्यांची काळजी घेणे हे त्यांना हवे आहे. मी लोकांना असे सांगीन, की पैसे, वस्तू देण्याबरोबरच या वृद्ध, निराधार लोकांसाठी थोडा वेळ द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले. 

‘या वृद्धाश्रमात राहणाऱ्या काही महिला निराधार आहेत; मात्र त्या शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित असल्याने काम करू शकतात. त्यांना घरबसल्या करता येतील असे उद्योग करण्याकरिता मदत मिळाली, तर त्या स्वाभिमानाने जगू शकतील. आटा चक्की, द्रोण-पत्रावळी बनवण्याचे मशीन अशा वस्तू दिल्या, तर या महिला स्वावलंबी होतीलच; पण रोजगारनिर्मितीही करू शकतील. अशा निराधार लोकांसाठी कायमस्वरूपी हक्काचा निवारा उभारण्यासाठी कोणी जागा दिली तर ती खूप मोठी मदत असेल. अशा मदतीची लोकांकडून अपेक्षा आहे,’ असे या वृद्धाश्रमाच्या संचालिका गंगा पाटील यांनी सांगितले. 

वाढदिवस म्हणजे ‘होऊ द्या खर्च,’ अशी वृत्ती बाळगणारे अनेक लोक आपण पाहतो; मात्र त्याच वेळी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना मनात ठेवून एखाद्या सामाजिक कामासाठी सढळ हाताने खर्च करणाऱ्या, लोकांकडून निधी गोळा करणाऱ्या संगीता सक्सेना आणि प्रिया कपाडिया यांच्यासारखे लोक नक्कीच प्रेरणा देतात.

(शिवगंगा वृद्धाश्रमाचे नवे रूपडे आणि गंगा पाटील, प्रिया कपाडिया व संगीता सक्सेना यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZHTCC
 कोणतेही काम सरकारच्या मदती शिवाय व्हायला पाहिजे।तिघींना माझा नमस्कार।
Similar Posts
‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ आरत्यांमध्ये हमखास चुकीच्या म्हटल्या जाणाऱ्या शब्दांवर कोटी करणारे संदेश हल्ली सोशल मीडियावर फिरत असलेले दिसतात. अशाच काही संदेशांवरूनच पुण्यातील सायली दामले यांना एक भन्नाट कल्पना सुचली. प्रबोधनाचा उद्देश ठेवून त्यांनी या चुकीच्या शब्दांना गंमतशीर चित्रांमध्ये उतरवलं. ‘उच्चारण’ या नावाने सुरू केलेली
राजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारा चाणक्य आणि त्याचे अर्थशास्त्र ‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य. अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर चाणक्याच्या नावाची चर्चा होते; पण प्रत्यक्षात चाणक्याची
मनाच्या श्लोकांच्या सामूहिक पठणाचा पुण्यात विश्वविक्रम पुणे : तब्बल १२ हजार शालेय विद्यार्थ्यांनी मनाच्या श्लोकांचे सामूहिक पठण करण्याचा विश्वविक्रमी उपक्रम पुण्यात २३ फेब्रुवारी २०१९ रोजी राबविण्यात आला. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय अर्थात एसपी कॉलेजच्या प्रांगणात सकाळी आठ ते दहा या वेळेत हा उपक्रम झाला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एवढ्या मोठ्या
...आणि त्याला लाभले नवजीवन पुणे : तुमच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान ही सर्वांत मोठी संधीदेखील असते, ही म्हण सार्थ ठरवत युनिव्हर्सल रुग्णालयातील डॉक्टरांनी मज्जारज्जू प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून येमेनमधील एका २२ वर्षीय तरुणाला नवीन जीवन दिले आहे. प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अनंत बागुल यांच्या नेतृत्वाखालील पुण्यातील चार डॉक्टरांच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language